जाणून घ्या तुमच्या राशीनुसार स्वभाव गुण
ग्रह नक्षत्र

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार स्वभाव गुण

  • Post author:

सनातन धर्मा मध्ये राशीला खूप महत्व आहे. मुलाच्या जन्मा नंतर बारा दिवसांनी मुलाचे नाव  ठेवण्याची रीत आहे. त्याला बाळसं असे म्हणतात. नाव ठेवतांना मुलाचा जन्म कोणत्या वेळेस झाले, त्याची वार-तिथी कोणती होती, त्याचे नक्षत्र कोणता होते,  हे सर्व बघितल्या जाते. मुलाचा जन्म वेळ, काळ बघून मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह,कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन यापैकी कोणत्या राशीत झाला असेल ते बघतात. पंचागानुसार नाव ठेवत असतांना नक्षत्राचे नाव, नाडी,योनी, गण, नक्षत्र देवता व तारे, आराध्य वृक्ष, स्वभाव गुण हे सर्व बघून. त्याचा आद्याक्षर कोणत्या नक्षत्रामध्ये मोडतो. त्या नुसार नाव ठेवतात. हे सर्व पाहण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. मनुष्याचा शरीर हा चुंबकत्विय शक्तीने बनलेला आहे. चुंबकाकडे ज्याप्रमाणे लोह आकर्षित होतो. (आकर्षणाचा नियम तुम्हाला माहित असेलच.) त्याचप्रमाणे नक्षत्रामध्ये विद्यमान असलेल्या ग्रहामुळे मनुष्याचा शरीरावर चांगले किवा वाईट परिणाम दिसून पडतात. जस चंद्राच्या गृत्वाकर्षानाने समुद्राला भरती, ओहटी येते. त्याच प्रमाणे मनुष्याला लागू पडतात. हे सर्व शास्त्र नुसार सांगितले आहे.

राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव गुण बनलेला असतो. जो ज्या राशीमध्ये जन्मलेला असेल त्यानुसार त्याचा स्वभाव असेल. तर जाणून घेऊया तुमच्या राशीचा स्वभाव कसा असेल.   

मेष

रास – मेष

उष्ण प्रकृती, रागीट, लहरी, पित्त व रक्तविकार यांनी त्रास पावणारा, तामसी, हेकेखोर, काटक, उतावळा, प्रवासाची आवड, जलद चालणारा, फिरण्याचे धंदे करणारा. डोळे पिंगट, लाल, निग्रही, केस अल्प, शरीर मध्यम उंच, कृश, विद्या व बुद्धी कमी, महत्त्वाकांक्षा मोठी, दृष्टी उग्र, अल्पसुखी, पवित्र वर्तणूक ठेवण्याविषयी जपणारा, धार्मिक बाबतीत भिऊन वागणारा, थोडासा अजागळ, कोणत्याही प्रकारचे आविर्भाव चेहऱ्यावर कमी, भावंडांनी दूर ठेविलेला, पित्यापासून दूर राहणारा, जन्मभूमीपासून दूरदेशी राहाण्याची आवड असणारा, प्रसंगी दुसऱ्याचे नुकसान करण्यास न डरणारा, भुतेखेते व नानाविथ दैवतांच्या उपासनेचा नाद असणारा, कमी भोजन करणारा, शाक-भाज्यांची आवड फार, कोणलाही लवकर प्रसन्न होणारा, चंचल बुद्धी, कामी, एकान्त अधिक प्रिय, अडखळत बोलणारा, दात तोंडाच्या बाहेर आलेले, दांत दिडके व मलिन, दंतरोगी, डोके व तोंड यांवर व्रण, नखे बाईट झालेली पाण्याला भिणारा, गुडघ्यांमध्ये दुर्बळ, सेवाचतुर, गुप्तपणे कामे करणारा, विशेषतः पुत्रसंततिवान व अल्पसंतशी, अशा लक्षणांचा मेषराशी आहे. आचारी, बाफेच्या यंत्रांजवळ काम करणारे, हत्यारे बनविणारे, सैनिक, एकाद्याचा सूड घेण्यात पटाईत असे लोक या राशीच्या अमलाखाली असतात.

वृषभ

रास – वृषभ

देवीची भक्ती करण्याची हौस, कांतिमान, वर्ण गोरा, मेदोयुक्त भरदार शरीर, तजेलदार चेहेरा, स्वच्छतेची आवड, डोळ्यांत सफेतपणा जास्त, मोहक, मांड्या, गाल, मनगटे व तोंड यांचे आकार गोल व मोठे, शरीर मध्यम उंच, पाठ, तोंड व बरगड्या यांवर बांग वगैरे विशेष चिन्हे, खेळांची आवड, निरोगी, दगदग सहन करण्यात पटाईत, त्यागशील, पुष्कळ गोष्टींकडे दुर्लक्ष करणारा, आळशी, स्थिर बुद्धी, चांगले चांगले पदार्थ भक्षण करण्याची आवड असणारा, सुखी, धनिक लोकांशी नित्य संबंध ठेवणारा, शूर, शत्रूवर पुष्कळदा विजय मिळविणारा, मातापितरांना सुख देणारा, वडिलार्जित इस्टेटीचा उपभोग घेणारा, स्थावर इस्टेटीची आवड विशेष, दागदागिने व सुंदर कपडे यांची आवड, स्त्रीप्रिय, विलासी, नाना प्रकारचे द्रव्यखर्च करणारा, कफयुक्त शरीर, जठराग्नी तीव्र, कन्यासंतती जास्त, संततिसंख्या अल्प, चपळ, विद्येची अभिरुची कमी, विद्या असली तरी विद्वान लोकांत मान कमी, अनेक प्रकारच्या विद्यांची आवड, बुद्धीला कुशाग्रपणा कमी. शेती व पशू यांचे सौख्य, छत्रचामरयुक्त, बंधू व पुत्र यांचे सुख नसलेला, क्षमाशील, मध्य व अंत्य क्यामध्ये सुखी, मित्रमंडळींपासून सुख भोगणारा, अशा लक्षणांचा वृषभ राशी आहे. शेतकी, बागायती, फळाफळावळ यांचा उद्योग करणारे लोक या राशीच्या अमलाखाली असतात.

मिथुन

रास – मिथुन

बोलकेपणा विशेष, विद्वान, विद्याव्यासंगी, पाठशक्ती जास्त, शास्त्री, पंडित, वक्ता, बुद्धिमान, कवी, ग्रंथकार, धूतज्ञ, कारकून, मंजूळ व प्रिय भाषण करणारा, प्रेमळ वर्तणुकीचा, ललितकलासंपन्न, बहुधा खरे बोलणारा, चिकाटी व निश्चय कमी, स्त्रियांचा अभिलाषी, स्वरूपवान, चेहरा सुरेख, हनुवटीच्या भागाकडे निमूळता, अवयव लांबट, डोक्याचा भाग मागच्या बाजूला नारळासारखा लांबट, शरीर सडपातळ, उंच, वृद्धपणी पोक

येणारा, जास्त जेवणाची आवड, डोळे साधारण तांबूस, जासूद, वकील, बातमीदार, असहिष्णू, शत्रूंवर विजय मिळविणारा, संततिसंख्या मध्यम पुत्रसंततीचे आधिक्य अशी मिथुन राशीची लक्षणे आहेत. वाड्मयप्रवीण, तर्ककुशल व बुद्धिचातुर्यवान माणसे या राशीच्या अमलाखाली असतात.

कर्क

रास – कर्क

तिरपे व जलद चालणारा, उंच कटी, शरीर सडपातळ व मध्यम उंच, पुढले दात रुंद व मोठे असून बोलताना सहज पुढे दिसणारे, चेहरा साधारण गोल व मोहक, हाताचे व पायांचे पंजे मोठे, अभद्र शब्द जास्त बोलणारा, चैनी, नाटकी, निष्काळजी , विद्याभिरुची कमी, प्रेमवश, प्रेमाच्या तडाख्यात सापडून त्याच विवंचनेत असणारा, स्त्रीकामी, मित्रवत्सल, बागबगीचे व जलाशय यांच्या संनिध राहण्याची आवड असणारा, उत्तम पोहणारा, पुष्कळ घरी निवास करणारा, देव ब्राह्मण यांची पूजा करणारा, शरीरात कफबाहुल्य, वारंवार शीतव्याधीने ग्रस्त, भावंडांत कन्याधिक्य विशेष , वडील बहिणींची संख्या जास्त, द्विभार्यासंपन्न, कुटुंबात विशेष सभ्य म्हणून गणला न जाणारा, गुह्यरोगी, भित्रा, चंचल बुद्धीचा, कन्यासंतती जास्त, संतती लवकर होणारी अशी कर्क राशीची लक्षणे आहेत. दारू, मादक पदार्थ, मोत्ये, मीठ, मासळी यांचे व्यापार करणारे, खलाशी, पाणक्ये असले लोक या राशीच्या अमलाखालचे असतात.

सिंह

रास – सिंह

उग्र चेहरा, हनुवटीचा भाग स्थूल, मोठे मुख, पिंगट डोळे, दात मजबूत, छाती रुंद व भरदार, कपाळ विस्तीर्ण, नाक नकटे, छाती पुढे काढून चालणारा, धर्माचरणाची पर्वा न करणारा, गंभीर, कमी बोलणारा, साहसी, किल्ले, राजधानीची ठिकाणे, पर्वतप्रदेश येथे निवास करणारा, विद्या साधारण प्रख्यात, तालीमवाज, वर्ण काळा, आवाज मोठा, घरीदारी प्रमुखत्वाने बागणारा, अंमलदार, धैर्यवान, स्त्रीद्वेष्टा, मांसाभिलाषी, त्वरित रागावणारा, भूक तहान यांनी पीडलेला, चिंतातुर, वृद्धपणी दंतरोगी, उदार, अभिमानी, मातृभक्त, शेतीची आवड विशेष, शृंगारांत न गुंतणारा, साधुजनांशी नम्र, शत्रूंवर विजय मिळविणारा अशी सिंह राशीची लक्षणे आहेत.

कन्या

रास – कन्या

सलज्जित राहणे, आळसत चालणे, मान वाकडी धरून चालणारा, चालताना हात फार हालविणारा, चेहरा रुंद गोल, उंची मध्यम, चाल हत्तीसारखी, स्त्रियांची लक्षणे विशेष सुकुमार, कलानिपुण, रतिप्रिय, परगृह व परधन यांचा उपभोग घेणारा, प्रियभाषणी, बहुधा व्यसनी, पवित्र वर्तनाची आवड लोकोपयोगी कामे करण्याची हौस, ललितकलासंपन्न, काव्याचा भोक्ता, जुन्या पद्धतीचे वर्तन विशेष प्रिय, दयाळू, देशाटन करणारा, नेहमी आनंदी, हसत बोलणारा, चांगल्या पदार्थाची आवड असणारा, पोषाखाची टापटीप न ठेवणारा, विद्वान लोकांशी परिचय ठेवणारा, काळजी कमी, साधारणतः विद्वान, शास्त्रव्यासंगी, वात-कफाचे प्राबल्य शरीरात विशेष असे कन्या राशीचे स्वरूप आहे. बातमीदार, सांगकामे, किरकोळ व्यापारी, बुकसेलर, छापखान्यांशी संबंध असणारे, खोदकाम करणारे, कलाभिज्ञ, निष्कारण मते बदलणारे व संकटाच्या वेळी भिणारे लोक या राशीच्या अमलाखाली असतात.

तूळ

रास – तूळ

देव-ब्राह्मण साधू यांचे पूजन करणारा, सत्त्वगुणी, स्वधर्माचरणी, पुण्यकर्मे करणारा, ईश्वरभक्त, समतोल वृत्तीचा, शुचिर्भूत, अतिशय उंच शरीर, उभट चेहरा, हाता पायांच्या नळ्या, बाकदार पाय, शरीर सडपातळ, वर्ण काळा, उंच नाक, प्रवासी, बोलताना मान उभी फार हालविणे, वारंवार हसणे, तोंड आकुंचित करून व मासलेवाईक भाषण, स्वर लहान, तडजोडीची आवड, न्यायकर्मामध्ये प्रवीण, उभा असताना व चालताना पोक काढल्यासारखा दिसणारा, दूरदूर पावले टाकून जलद चालणारा, देवघेवीमध्ये कुशल, सधन, रोगी, बंधूंवर उपकार करणारा, बंधुवर्गाकडून नेहमी निर्भर्त्सना पावणारा, विद्वान, शास्त्रज्ञ, कफवातयुक्त शरीर, दगदग फार भोगणारा, आपल्या मनाचा थांग लागू न देणारा, कमी, त्यातही विशेष पुत्रसंतती, वृद्धावस्थेत आप्तेष्टांचा वियोग होणे असे तूळ राशीचे स्वरूप आहे.

वृश्चिक

रास – वृश्चिक

वक्षस्थळ व डोळे यांचे आकार मोठे, कमरेच्या वरच्या भागापेक्षा खालचा भाग तोकडा, अवयव तोकडे, उंची कमी, नाक मोठे व फुगीर, बांधा मजबूत, कुढ्या मनाचा, गुप्त विचारांनी सूड घेणारा, बालपणी रोगी, पिंगट वर्णाचा, निरनिराळ्या वेळी निरनिराळे विचार प्रकट करणारा, शूर, त्यागशील, गंभीर, दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणारा, साहसी, पित्तरोगी, कुटुंबसंपन्न, मतलबी लोकांच्या जाळ्यात सहज सापडणारा, राजसेवक, शत्रूंशी नेहमी झगडणारा, परस्त्रीशी मैत्री ठेवणारा, गुरू व मित्र यांच्याशी द्रोह करणारा, क्रूरस्वभावी, गुप्त पापे करणारा, डॉक्टरी विद्यासंपन्न, रसायने तयार करणारा, क्षुद्र कामे करणारा, स्त्रियांचा शोकी, भुयारात किंवा एकांतात राहण्याची आवड बाळगणारा, हलक्या कानाचा, गविष्ठ. दुसऱ्यावर वचक ठेवणारा, संतती जास्त व त्यांत कन्याधिक्य असे वृश्चिक राशीचे स्वरूप आहे. रसायनशास्त्रवेत्ते, डॉक्टर, वैद्य, भानगडीचे धंदे असे लोक या राशीच्या अंमलाखालचे असतात.

धनु

रास – धनू

मुख व मान हे अवयव अत्यंत भरदार व लांबट, छाती पुढे करून डुलवीत चालणारा, हनुवटी मोठी, तालीमबाज, शरीर बळकट व निरोगी, वर्ण तांबूस, केस कमी, मलिन, शक्तीच्या बाहेर उलाढाली करणारा, काटक, नाक चाफेकळीसारखे, शरीराची विशेष बांधेसूद, धिप्पाड, पीळदार दंड, मनगटे जाड, मारामारीत पराभव न घेणारा, बळाचा गर्व विशेष, वर्ण साधारण गोरा, मोहक, लढवय्या, डोळे क्वचित पिंगट, राजाचा मित्र, विद्या कमी, तेजस्वी, उदार, कविता-कुशल, पितृद्रव्यप्राप्ती असणारा, कर्मशील, शिल्पज्ञ, बंधुद्वेष्टा, सामोपचाराने वश होणारा, बलात्काराने वश न होणारा, न्यायप्रिय, लज्जित, आपल्या कुलामध्ये प्रमुखपणाचा मान मिळविणारा, शत्रुपक्षावर विजय मिळविणारा, स्वपराक्रम श्रेष्ठतेस पोहोचणारा, संततिसंख्या मध्यम व त्यांत पुत्राधिक्य असे धनुराशीचे स्वरूप आहे.

मकर

रास – मकर

स्वस्त्री व स्वपुत्र यांचे फार लाड करणारा, धर्मिष्ठ, शरीराने कृश व त्यात कमरेच्या खालचा भाग जास्त कृश, नेत्र उत्तम, कमर बारीक, प्रेमळ अंत:करणाचा, कित्येक वेळा शरीर लङ, मिशा मोठ्या व कल्लेदार, भुवयांचे केस राठ, अंगावर केस जास्त, शरीर क्वचित ओबडधोबड, आपलपोट्या, खादाड, चिडखोर, जमाखर्च ठेवण्याची आवड बाळगणारा, जेवण अगदी कमी किंवा अगदी जास्त, तोंडे वेडीवाकडी करण्याची जास्त सवय, बोलताना एकदम मोठा किंवा एकदम हळू आवाज काढणारा, बातबद्ध शरीर, स्नानसंध्या नियमाने करणारा, दूरदूरचे प्रवास करणारा, शरीराच्या मानाने डोक्याचा आकार मोठा, जबडा मगरासारखा किंवा फार बारीक, विद्या व बुद्धी कमी, चंचल, सामान्यत: मूर्खच, संगीतज्ञ, डोंगर-बने यांत राहण्याची आवड, कुत्सितशील, उदारपणा कमी, संततीमध्ये कन्याधिक्य व संततिसंख्या जास्त असे मकरराशीचे स्वरूप आहे.

कुंभ

रास – कुंभ

मान उंटासारखी पुढे आलेली, शिरा विशेष, केस राठ, उंच शरीर, पाय, मांड्या, पोटऱ्या, पाठ, तोंड, कमर, पोट यांचे आकार मोठे, वर्ण काळा, तोंडवळा गोल, मिशा कमी असून कंसाकार, नेहमी खांकरण्याची व खांदा हालविण्याची सवय, डोक्याला टक्कल, कपाळ दोन बाजूंस जास्त निमुळते, चेहरा देखणा, विद्याव्यासंगी, बुद्धिमान, कल्पक, कावेबाज, तत्त्वज्ञ, परस्त्री व परधन यांची इच्छा करणारा, पापरत, चांगले मित्र लाभणारा, सुगंधी पदार्थावर विशेष प्रेम, कधी कधी मूर्खाप्रमाणे वागणारा, क्षणात लहान कारणावरूनही राग येणारा, आळशी, द्यूतप्रिय, कठोर अंत:करणाचा, बंधूंपासून वेगळा राहणारा, संपत्ती नेहमी कमी-जास्त होत राहणारा, ज्याच्या संपत्तीचा लोक मत्सर करितात असा, विवक्षित कार्यक्षेत्राबाहेर फारशी प्रसिद्धी न पावणारा, संतती फार कमी असे कुंभराशीचे स्वरूप आहे.

मीन

रास – मीन

परधन व जलधन यांचा भोक्ता, स्त्री व वस्त्रे यांत निमग्न, गोंडस, स्थूल व डेंगू असे शरीर, काहीसा सुंदर, नाक उंच, कपाळ मोठे, डोळे मोठे किंवा फार लहान, हातपायादी अवयव आखूड, जननेंद्रिय फार बारीक, वर्ण साधारणतः काळा, विद्या व बुद्धी साधारण, संतती विशेष व त्यांत कन्याप्राधान्य, स्त्रीवश, गुप्त धन भोगणारा, कीर्तीची हाव धरणारा, जनावरांची आवड, भित्रा, कर्तबगारी विशेष नसल्यामुळे सात्त्विक भासणारा, संगीताचा शोकीन अशी मीनराशीची लक्षणे आहेत.

ही जी बारा राशींची लक्षणे दिली आहेत, ती त्या त्या राशी लग्नस्थानी असून जितक्या बलवान असतील तितक्या प्रमाणात माणसाचे ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतील. त्या राशी लग्नस्थानी असून त्यात चंद्र असेल तर विशेष रीतीने ही लक्षणे दृष्टिगोचर होतात. लग्नस्थ निराळी राशी व चंद्र निराळ्या राशीचा असा प्रकार असता त्या दोन्ही राशींची लक्षणे मिश्र झालेली दिसतात. शिवाय या राशीत रवी, मंगळ, गुरू, शुक्र, शनी, राहू, केतू यांपैकी ग्रह असतील, तर ते आपआपल्या स्वभावाप्रमाणे त्या राशीच्या लक्षणांत फेरफार घडवितात. उदाहरणार्थ, कुंभराशीचे लक्षण उंच शरीर असे आहे. पण तेथे जर राहू असेल तर मनुष्ये

ठेंगू असलेलीही आढळतात. कर्क राशीचे लक्षण अत्यंत कामी असे आहे. पण तेथे गुरू असेल तर परस्त्रीसेवन घडणे अशक्य आहे. याशिवाय राशिविभागाच्या प्रारंभापासून मध्यापर्यंत ही लक्षणे विशेष रीतीने दिसतील, पण राशिमध्यापासून राश्यंतापर्यंत अनुक्रमाने ती अस्पष्ट होत जातात.

ही माहिती ग्रंथावरून संकलित केलेली असून कोणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही.

Leave a Reply